
परवा Linkedin वर Fake Weddings च्या नव्या trend बद्दल वाचले आणि डोक्यातून हवाच गेली. हा काय नवीन प्रकार आहे? लोकं पैसे भरून, चांगले-चुंगले कपडे घालून एका लग्नाला जातात, तिथे लग्नाच्या विधींचा आनंद घेतात, संगीत आणि जेवणाचा पण आस्वाद घेतात आणि हे सगळे नवरा-नवरी नसताना?
हो नवरा-नवरी सोडून बाकी सगळे असते या लग्नात! हे म्हणजे आजकालच्या spiritual गुरूंसारखे झाले – नुसतीच दाढी आणि आत ऋषीच नाही! सुरुवातीला ही post Linkedin वर वाचल्यामुळे डोक्यात Business Models आणि असे सगळे विचार आले, पण त्याहून पलीकडे हा विषय खूप खोल आहे हे सुद्धा जाणवले.
सगळ्यात पहिले म्हणजे लग्नाची आमंत्रणे कधी येतात आणि आम्ही कधी लग्नाला जाऊन सगळ्यांना भेटतो आणि त्याबरोबरच कधी त्या नवीन जोडप्याला आशीर्वाद देतो – या सगळ्यासाठी उत्सुक असलेले माझे आई – बाबा आठवले. गेली काही वर्षे खरेच लग्नांचा दुष्काळच झालाय म्हणा ना. पूर्वीच्या काळी एका वर्षात आठ-आठ, दहा-दहा लग्नाला जाणारे आमचे आई-बाबा कसेतरी तीन-तीन वर्षातून एकदा लग्नाला जात आहेत आजकाल!
कोणी लग्नच करत नाहीये यार!
असे का होत आहे याचा खरेच विचार व्हायला हवा. माझ्या मते लग्न म्हणजे एक बस पकडण्यासारखे आहे. पूर्वी मी bachelor असताना नोकरी निमित्ताने मुंबई ला होतो आणि घरी सातारला बस ने जायचो. आजच्या सारखे online reservation असला प्रकार त्या काळी नव्हता आणि station वर जाऊन reservation वगैरे करण्या इतपत शिस्तबद्धता माझ्यात नव्हती, त्यामुळे bus stop वर उभे राहून येईल ती bus पकडणे हा आम्हा तरुणांचा एक शिरस्ता होता.
तर सांगायची गोष्ट म्हणजे त्या वेळी वेगवेगळ्या buses आमच्या highway च्या stop ला थांबायच्या आणि प्रवाश्यांना घेऊन जायच्या. कधी एकदम भरलेली लाल पिवळी एस टी यायची, कधी तशीच जुनी पण बसायला जागा असलेली गाडी यायची, तर कधी asiad म्हणजे आमच्या काळातील premium बस यायची. मला वाटायचे asiad यावी आणि मस्त खिडकी मधली जागा मिळून वारं खात, बाहेरची सगळी मजा बघत घरी जावे! पण आपल्या मनासारखे तंतोतंत कधी होते काय आपल्या आयुष्यात? हेच मी शिकलो त्या काळात. दर वेळी घरी जाताना decision making ची test असायची एक प्रकारे.
नंतर चांगली गाडी येईल म्हणून आलेली गाडी पकडायची कि सोडायची हा प्रश्न आणि आता आलेल्या स्थळाला हो म्हणायचे कि अजून चांगल्या स्थळाची वाट बघायची हा यक्ष प्रश्न – दोन्ही खरे म्हणजे सारखेच आहेत. एकीकडे आठ तासाचा प्रवास आहे तर दुसरीकडे जीवन मरणाचा.
आजच्या पिढीने (कि त्यांच्या आई बाबांनी?) मला वाटते याच decision चा मोठा धसका घेतला आहे. सगळ्यांनाच आजकाल asiad मधून प्रवास करायचा आहे. आणि त्यासाठी वाट्टेल तेवढा वेळ थांबायची त्यांची तयारी आहे. पण खूप उशीर झाला आणि सगळ्या asiad निघून जाऊन एक गच्च भरलेली लाल पिवळी एस टी तर त्यांच्या नशिबात नाही ना – हा खरा प्रश्न आहे .
मला विचाराल तर सगळे च्या सगळे ३६ गुण जुळण्याची वाट न पाहता, अगदी ३ -४ च पण घट्ट जुळणारे गुण पाहून लग्न करा. फायद्यात राहाल. आणि हो एकदा एक गाडी पकडली कि वळून दुसऱ्या गाडीकडे बघू नका. हे जमले तर जास्तच फायद्यात राहाल.
पण ज्यांनी ठरवले आहे कि लग्नचं करायचे नाही त्यांचे काय? आणि त्याहीपेक्षा त्यांच्या निर्णयामुळे जे सामाजिक प्रश्न उभे राहणार आहेत त्याचे काय?
ही सगळी Fake Weddings ला पैसे देऊन जाणारी जनता जर माझ्या आई-बाबांच्या वयाची असती तर विषय वेगळा होता, पण ती आहे आपली नवीन पिढी – Gen Z!
स्वतः लग्नापासून पळून जाणारी हि पिढी अश्या Fake Weddings ना हजेरी लावते म्हणजे नक्की काय चालू आहे? जर ते याकडे एक dating चा platform म्हणून पहात असतील – जेणेकरून आपला जोडीदार मिळेल म्हणून – तर अतिशय उत्तम आहे. पण जर याकडे एक enjoyment आणि party म्हणून पहिले जात असेल, आणि आपल्याला कुठे लग्न करायचे आहे – Let’s Enjoy! असे असेल तर फारच वेगळा विषय आहे.
कुठलीच जबाबदारी नको म्हणणारी हि नवीन पिढी तर नाही ना? ज्यांना ती एस टी bus च नको, फक्त आजची enjoyment झाली म्हणजे बास? पण यांना कसे कळणार कि खरी enjoyment हि घेण्यात नाही तर देण्यात आहे? जे तुम्हाला पालक झाल्याशिवाय कळणारच नाही ?
आपल्या चार पोरींची लग्न करायची आहेत म्हणून काटकसरीने राहणारी माझ्या आई-वडिलांची पिढी हुशार कि लग्नच नं करता पर्यायाने सगळे पैसे वाचवणारे पण स्वतः वर उडवणारी हि Gen Z हुशार?
शादीका लड्डू – जो खाये वो भी पचताये और जो नं खाये वो भी पचताये – यातलं कुठलं ‘पचताये’ त्यातल्या त्यात बरं? माझे मत ‘खाके पाचताओ’ हेच आहे, तुमचे काय?