सध्या सगळीकडे फुटबॉल ची हवा आहे. फिफाचा फुटबॉल वर्ल्ड कप सुरु आहे. भारतीयांना Match च्या वेळाच फक्त match होत नाहीयेत. बाकी सगळे मस्त आहे.
काय ती स्टेडियम्स , काही तर completely closed आहेत, ते हिरवे गार ग्राउंड, ते जबरदस्त संख्येनं आलेले फॅन्स, ते एकदम ‘फिट’ असे खेळाडू – जणू फुटबॉल म्हणावे की फिटबॉल हा प्रश्नच पडावा!
आणि तो ‘गोल’! ज्या एका गोल साठी एवढा सगळा प्रपंच केला जातो तो गोल आणि सगळ्यात भारी म्हणजे ते गोल झाल्यावरचे Celebration!
इथे मला मी लहानपणी आयुष्यात पहिल्यांदा केलेला गोल आठवला. एक तर जशी भाषेमध्ये Primary, Secondary आणि Tertiary Languages असतात, तसं जर स्पोर्ट्स मध्ये काढलं तर फुटबॉल हा आमचा Tertiary किंवा त्याहीपेक्षा खालचा खेळ.
आमचा प्रायमरी खेळ म्हणजे क्रिकेट. पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडला असेल तर आणि तरच आम्ही फुटबॉल खेळायचो. तोही त्या क्रिकेट च्याच रबरी बॉलने. तर माझा पहिला वाहिला गोल – मी मोठ्या शिताफीने बॉल चा कंट्रोल घेऊन आमच्या गोलच्या भिंतीकडे कूच केली आणि बघतो तर काय गोलीच गायब. कारण काय तर ‘फिरता गोली.’
आम्ही लहान असताना जसे क्रिकेट मध्ये कुणाला बॉलिंग नकोशी असते तसे गोली व्हायचे पण जड व्हायचे. मग मांडवली म्हणून एखादा तयार व्हायचा तोही ”फिरता गोली’ म्हणून. हा फिरत गोळी ग्रॉउंगच्या अर्ध्या भागापर्यंत बिनधास्त फिरत असे.
आपल्याकडे सगळ्यांना गोल कारण्यामध्येच रस होता बाकी टीम वर्क वेगैरे नंतर.
तर मी आपला गोल करायला गेलो आणि मोठ्या शिताफीने गोल करून टाकला.
मजा आली पण गोली नसल्यामुळे त्या गोल ला काही अर्थ नव्हता. खऱ्या यशाचा आनंद हा कुणीतरी विरोध केला तरच असतो, नाहीतर नुसतेच एखाद्या फुटलेल्या पेपर मध्ये, सगळे प्रश्न आपल्यालाच माहित असून, पहिल्या येण्याला काय अर्थ.
तर माझा हा पहिला गोल काही मला विशेष आवडला नव्हता. आणि हे Messi, Ronaldo आणि Mbappe तर गोल वर गोल करीत असतात. बघताना फक्त आणि फक हेवा वाटतो त्यांचा. पण जेव्हा ते लोकं पडतात तेव्हा अक्षरशः आपलीच हाडे मोडत आहेत कि काय असे वाटल्यावर तो हेवा जरा (जरा काय बराच!) कमी होतो.
एकूणच फ़ुटबाँल वर्ल्ड कप ने जे जगाला एकत्र आणले आहे त्याला तोड नाही. आपल्याला माहित सुद्धा नसलेली देशांची (आणि माणसांची) नावे बघितले की हे जग किती मोठे आहे हे कायम जाणवत राहते.
मला खेळातलं जर सगळ्यात काय आवडत असेल तर ते म्हणजे
‘Sports teach you to accept your defeat gracefully’.
Match संपल्यावर सगळे खेळाडू जेव्हा हस्तांदोलन करतात त्यासाठी मी कुठलाही सामना बघू शकतो. जगातले सगळ्यात सुंदर चित्र कोणते तर हे! या फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये कितीही गोल होवोत, पण सगळ्यात महत्त्वाचा एक ‘गोल’ मात्र नेहमीच यशस्वी होतो तो म्हणजे ‘सगळ्या मानवजातीला एकत्र आणणे’. त्या गोल चे celebration हे व्हायलाच पाहिजे आणि ते सुद्धा या आजच्या युद्धमय वातावरणात. Celebration तो बनता है!
आणि या Celebration ला चार चांद लागतील जेव्हा आपला भारत उद्या फुटबॉल वर्ल्ड कप मध्ये भाग घेऊ शकेल आणि आपला तिरंगा घेऊन आपण सगळे ते गोल झाल्यावर तो फडकवू! त्या गोल साठी सर्वांना शुभेच्छा!