परवा एका जीवन विषयक गाढ्या अभ्यासकाबरोबर चक्क पाच तास गप्प्पा मारण्याचा योग आला. चांगले चुंगले खाद्यपदार्थ, बाहेर मस्त पाऊस, हातात गरम गरम चहा, सर्व विषयांवर गप्पा आणि तुफान विनोद! चांगला योग जुळून आला होता. वेग वेगळ्या विषयांवर मंथन झाल्यावर मीच मुद्दाम म्हंटलं जरा जीवनाच रहस्य जाणून घेऊ, म्हणून विचारलं की माणसाच्या जगण्याचा एका वाक्यात सारांश सांगायचचा असेल तर काय सांगाल? तर ते म्हणाले :
जन्माला येणे, आपण स्वतः लग्न करणे आणि मग आपल्या मुलांची लग्नं करणे. हेच मुख्य काम. बाकीचं सगळं म्हणजे अंधश्रद्धा आहे.
माझ्या हातातला चहाचा कप अगदी पडायच्या बेतात आला. जीवनावर इतक्या परखड शब्दातील भाष्य मला अगदी सुखावून गेले. माणसांन कसं एकदम स्पष्टवक्तेपणानं बोलावं…
खरं सांगायचं तर तो गाढा अभ्यासक दुसरा तिसरा कोणी नसून मीच होतो. हल्ली पुण्यात (खरं म्हणजे वाकड/हिंजेवाडी मध्ये – ते पुण्या बिण्याचं आम्हाला माहीत नाही) पावसामुळे पाच-पाच तास लाईट जाण्यामुळे अश्या भेटींचा योग वारंवार येऊ लागला आहे.
तर असो आपला मूळ मुद्दा ‘लाईट’ नसून लग्न आहे.

जन्म, लग्न, म्रुत्यु – या आपल्या आयुष्यातील तीन मुख्य घटना. नंबर १ आणि ३ आपल्या हातात नसते. लग्न मात्र आपल्या हातात असते. आताच्या पिढीच्या ते खऱ्या अर्थाने हातात आहे. म्हणजे आताच्या पिढीच्या कुठल्याही फॉर्म मध्ये Married च्या पुढे Yes /No च्या पुढे ‘अजिबात नाही’ असा अजून एक ऑपशन टाकावा असे माझे सरकार ला नम्र निविदन आहे.
पण आमच्या पिढीचं वेगळं होतं. आमच्या पिढीत आमचं लग्न खरं म्हणजे आई-वडिलांच्या हातात असायचं.
शिक्षण, नोकरी चा मुख्य उद्देश फक्त आणि फक्त ‘लग्न व्हावे’ हाच होता.
पूर्वी मुली विणकाम, भरतकाम वगैरे करत असत. त्याचा उगम पण ‘कांदे पोह्या’च्या कार्यक्रमात चार मार्क जास्त मिळावेत हाच असावा. मी तरी कुठलीही मुलगी लग्न झाल्यावर विणकाम, भरतकाम करताना आजपर्यंत बघितली नाही.
तर जीवनाचे इतिकर्तव्य म्हणजे ‘यंदा कर्तव्य आहे’ हेच असायचे.
९० च्या दशकातील ते पिक्चर म्हणजे आपल्या समाज जीवनाचे खरे प्रतीक होते. तो प्रेमाचा दुष्काळ, ती ‘लंबी जुदाई’, तो ‘दुनिया कि कोई भी ताकद हमें जुदा होने से नही रोक सकती’ वाले डायलॉग्स…
एक मात्र होते आई-वडील लग्न कर म्हणायचे पण काही लग्नांना विरोध पण करायचे, त्यामुळे खरं म्हणजे लग्न करायला जास्त मजा येत असणार. हा मुद्दा नोट करावा. आजच्या पिढी ला कदाचित ती मजा नाही – ‘पळून जाऊन’ लग्न करण्याची.
आजकाल म्हणजे लग्न करतोस? आणि मुलगा/मुलगी होय म्हंटली कि लगेच आई बाबा लग्न लावून देतात. ‘त्यात काय मजा’असे वाटत असल्याने पुढची पिढी लग्नापासून दूर जात असावी असा माझा एक निष्कर्ष आहे.
तर मुख्य मुद्दा लग्न कसे जीवनाच्या केंद्रस्थानी होते हा आहे. पण लग्नाचा खरा फायदा लग्न झाल्यानंतर बऱ्याच वर्षांनीं होतो. लग्न म्हणजे लोणच्या सारखे असते. ते जितके मुरेल, तितके चांगले.
मला विचाराल तर लग्नाचा खरा फायदा म्हणजे ‘नवरा किंवा बायको’ होणे नसून ‘आई किंवा वडील’ होणे हा आहे. जगण्यातला खरा आनंद ‘घेण्यात’ नसून तो ‘देण्यात’ आहे – हे मला फक्त आणि फक्त पालक झाल्यावरच कळले.
आणि लोणच्या सारखे तुमचे जोडीदाराबरोबर नाते – एकदा ते लोणचे मुरले की खरी मजा येते. मग फुटबॉल मध्ये जसे एकमेकांना पास देऊन गोल करतात तसे आपण जोडीदाराबरोबर टीम वर्क करून आयुष्यातील अनेक ‘गोल्स’ करू लागतो. काही गोल होतात, काही होत नाहीत (कधी कधी सेल्फ गोल्स पण होतात), पण आपण आयुष्यातला फ़ुटबाँल खेळतो हे महत्त्वाचे!
खरी मजा त्या खेळण्यामध्येच आहे.
तर लग्न या विषयावर लिहायचं आणि प्रेम या विषयावर नाही हे म्हणजे अशक्य आहे. प्रेम ही संकल्पनाच अगदी चाऊन चाऊन चोथा झालेली आहे.
हिंदी पिक्चर नी आपल्याला शिकवले आहे की ‘प्रेमाचा शेवट लग्नात होतो’. उलट मी तर असे म्हणेन की ‘लग्नाचा शेवट प्रेमात होतो’.
त्यांचे म्हणणे काही चूक नाही पण माझे म्हणणे हे जवळ जवळ ९५% जोडप्यांना लागू होत असावे.
खूप लोक म्हणत असतात की लग्नसंस्था टिकणार नाही. मला तसे वाटत नाही. अगदी सात जन्माची अपाॅंटमेंट वगैरे नाही टिकणार पण एक जन्माची मात्र टिकेल असे वाटते. काडीमोड कदाचित वाढतील पण ते काही मुळ संस्था मोडकळीस आणू शकणार नाहीत.
आजही अटलांटा (आमची सोसायटी – हो ‘अटलांटा’ नाव ट्रंम्प यायच्या आधीपासून आहे. ते व्हिसा वगैरे चं टेन्शन नाही. पाहिजेल तेवढं रहा, बिनधास्त!) मध्ये जेव्हा एखादं नवीन जोडपं बाबा गाडीतून बाळाला फिरवताना दिसते, तेव्हा मला बरे वाटते. पण जेव्हा शेजारीच नवीन होऊ घातलेल्या ‘स्टुडिओ’ अपार्टमेंट बघितल्या कि नवीन पिढी एकटीच राहणार कि काय अशी काळजी वाटते.
माणसानं कितीही प्रगती केली, कितीही AI आपल्या आयुष्यात आलं तरी ‘My Biggest Creation is You’ हे आयर्न मॅन च्या वडीलांच आयर्न मॅन ला उद्देशून म्हणालेलं वाक्य, जोपर्यंत मानव जात आहे तोपर्यंत relevant राहील यावर माझा ठाम विश्वास आहे.
तर विषय खूप मोठा आहे पण काही ‘प्रापंचिक’ कामांमुळे इथे थांबत आहे. बाकी आज आमच्या लग्नाचा वाढदिवस असल्यामुळे या गहन विषयाला हात घातला आहे. चुक भूल द्यावी घ्यावी.